भुवनेश्वर : 30 वर्षीय विवाहितेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना ओदिशामध्ये घडली आहे. पत्नी गाडीत बसल्याचं समजून पती पुढे निघून गेला आणि महिला रस्त्यावर एकटीच राहिली. याचा गैरफायदा घेत सहा जणांनी विवाहितेवर गँगरेप केला.
ओदिशातील अनुगुल जिल्ह्यात गुरुवारी रात्री ही घटना घडली. गुरुवारपासून बेपत्ता असलेली महिला रविवारी संध्याकाळी दीडशे किलोमीटर दूर असलेल्या जगतसिंगपूर जिल्ह्यात सापडली. दोन दिवस ठावठिकाणा न लागल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली गेली होती.
पीडित महिलेची जबानी अद्याप नोंदवण्यात आली नसली, तरी सामूहिक बलात्कारापूर्वी घडलेल्या घटनांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
संबळपूर जिल्ह्यात राहणारं संबंधित दाम्पत्य गाडीने मुलीसह कटकच्या दिशेने निघालं होतं. पती गाडी चालवत होता, सहा वर्षांची मुलगी त्याच्या शेजारी बसली होती, तर पत्नी मागे बसली होती. अनुगुल जिल्ह्यात नक्ची गावाजवळ असताना रात्री दहा वाजताच्या सुमारास पत्नीने पतीला गाडी थांबवण्यास सांगितलं.
लघुशंका करण्यासाठी महिला गाडीतून खाली उतरली. हात धुण्यासाठी पाणी घ्यायला ती पुन्हा गाडीजवळ आली, पाण्याची बॉटल काढून तिने दरवाजा लावला आणि पुन्हा आडोशाला गेली. मात्र दरवाजाचा आवाज ऐकून पत्नी गाडीत बसली असा समज पतीने केला, आणि त्याने गाडी सुरु केली.
आपली पत्नी मागे बसलेली नाही, हे त्याला जवळपास 17 किमीपर्यंत ध्यानातही आलं नाही. बोईंडाजवळ मुलीला चॉकलेट घेण्यासाठी तो खाली उतरला. दुकानातून परत आल्यावर मागे बायको नसल्याचं त्याला लक्षात आलं. मात्र नुकतीच ती कुठेतरी उतरली असेल, असं त्याला वाटलं.
बराच वेळ पत्नी न आल्यामुळे तो घाबराघुबरा झाला आणि त्याने मार्केटमध्ये पत्नीची शोधाशोध सुरु केली. नक्ची परिसरात असताना शेवटचं पत्नीशी बोलल्याचं त्याच्या लक्षात आलं, त्यामुळे तो तात्काळ नक्चीला गेला. तिथेही तिचा शोध न लागल्यामुळे त्याने पुन्हा बोईंडा गाठलं. अखेर हडपा पोलिसात त्याने तक्रार दाखल केली. पोलिसांना तीन दिवस पत्नीचा शोध घेता आला नाही.
पीडित महिला राष्ट्रीय महामार्गावरुन एकटी चालत असताना सहा जणांनी तिला रिक्षात बसवलं अशी माहिती अनुगुल पोलिसांना मिळाली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे.
पत्नी गाडीत बसल्याचं समजून पती निघाला, महिलेवर गँगरेप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 May 2018 01:04 PM (IST)
पत्नी गाडीत बसल्याचं समजून पती पुढे निघून गेला आणि महिला रस्त्यावर एकटीच राहिली. याचा गैरफायदा घेत सहा जणांनी विवाहितेवर गँगरेप केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -