नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत वाहतुकीसाठी पुन्हा एकदा Odd-Even नियम लागू करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. 4 ते 15 नोव्हेंबर दरम्यान दिल्लीतील वाहतुकीसाठी हा नियम लागू असणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या काळात दिल्लीतील जनतेला सरकारकडून प्रदुषणापासून बचावासाठी मास्क देखील वाटण्यात येणार आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या नियमानूसार वाहनाच्या नंबर प्लेटवरील शेवटचा आकडा ऑड(1,3,5,7,9) असेल तर महिन्याच्या 5,7,11,13 आणि 15 तारखेला वाहन चालवता येणार आहे. तर वाहनाच्या नंबर प्लेटवरील शेवटचा आकडा इवन(2,4,6,8) असेल तर महिन्याच्या 4,6,8,10,12,14 तारखेला गाडी चालवता येणार आहे.


तसेच दिवाळीच्या निमित्ताने फटाके न फोडण्याचं देखील त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. दिल्लीतील प्रदुषणावर नियंत्रणासाठी केजरीवाल सरकारकडून 'विंटर अॅक्शन प्लान' तयार करण्यात आला आहे. यामध्ये ऑड-इवन वाहतूक नियमासह मोफत मास्क, कचरा जाळण्यास प्रतिबंध, प्रदूषणमुक्त दिवाळी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र दिल्लीत ऑड-इवनची गरज नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही बनवलेल्या रिंग रोडमुळे दिल्लीतील प्रदूषण बरेच कमी झाले आहे. येत्या 2 वर्षात ते आणखी कमी होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.