नवी दिल्ली : अयोध्येत आजपासून 25 वर्षांपूर्वी लाखोंच्या संख्येने हिंदू कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत.

देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. यांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. सकाळी साडे दहा वाजता हजारो कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला आणि घुमटापर्यंत पोहोचले. प्रत्येकाच्या मुखात त्यावेळी 'जय श्री राम'चा नारा होता.

अयोध्येतील वादग्रस्त वास्तूपर्यंत पोहचलेला जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. वादग्रस्त वास्तूजवळ जवळपास दीड लाख कारसेवक जमा झाले होते. त्यामुळे वास्तूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यावेळी अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती.

वरीष्ठ पोलीस अधिकारी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कारसेवकांना रोखण्याची हिंमत कुणीही करत नव्हतं. कारसेवकांवर कुणीही गोळी चालवणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी आधीच दिले होते.

त्यावेळी परिस्थिती प्रतिकूल झाल्याची जाणीव झाली होती. अयोध्येत येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. जेणेकरुन देशभरातून येणारे कारसेवक अयोध्येपर्यंत येणार नाहीत, असं तत्कालीन पोलीस अधिक्षक अखिलेश मेहरोत्रा सांगतात.

वेळ सरत जाईल तशी परिस्थिती भीषण होत होती. कारसेवक आणखी भडकले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 10 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते, मात्र जमावाला पांगवण्याची हिंमत कुणामध्येही नव्हती.

दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पहिला घुमट तोडण्यात आला आणि 4.55 वाजता संपूर्ण वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. कारसेवकांनी त्याच जागी पूजा करुन राम लालाची स्थापना केली.

10 हजार पोलिसांच्या उपस्थितीत दीड लाख कारसेवकांनी वादग्रस्त वास्तू पाडली आणि हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस असल्याचं मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी सांगितलं. याच घटनेने देशाचं राजकारण बदललं. 6 डिसेंबर रोजी वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली आणि केंद्र सरकारने कल्याण सिंह यांचं सरकार बरखास्त केलं.

संबंधित बातम्या :

बाबरी मशीद : अडवाणी, जोशी, भारतींवर कट रचल्याचा खटला!


अडवाणी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांचं पुढे काय?