पाटणा : बिहारमधील एका रुग्णालयात सर्व नर्सनी मिळून डॉक्टरला बेदम चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टरने महिला कर्मचाऱ्याची छेड काढल्यामुळे नर्सचा संताप झाला.

बिहारच्या कटिहारमध्ये असलेल्या रुग्णालयात ही घटना घडल्याची माहिती आहे. संबंधित डॉक्टरवर महिला कर्मचाऱ्याची छेड काढल्याचा आरोप आहे.

रुग्णालायतील नर्स वरिष्ठ डॉक्टरकडे छेडछाडीची तक्रार करण्यासाठी गेल्या. आरोपी डॉक्टरलाही तिथे बोलवण्यात आलं. आरोपी डॉक्टरला आपल्या ताब्यात देण्याची मागणी नर्सनी केली. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीत नर्सनी डॉक्टरला अक्षरशः चपला काढून मारहाण केली.

मारहाणीचा प्रकार कॅमेरात कैद झाला असून त्याचा व्हिडीओही वायरल झाला आहे. एक व्यक्ती डॉक्टरला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिस घटनास्थळी पोहचेपर्यंत आरोपी रुग्णालयातून फरार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.