मुंबई : काही विमानांसारखं रेल्वे प्रवासादरम्यानही आता प्रवासी घरगुती सामान, सौंदर्य प्रसाधने आणि फिटनेस उपकरणं खरेदी करु शकतील. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. सुरुवातीला काही विशेष रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.


पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने एका खासगी कंपनीसोबत पाच वर्षाचा करार केला आहे. 16 मेल आणि एक्सप्रेस रेल्वेंमध्ये प्रवांशासाठी ही सुविधा सुरु करण्यात येईल. या कंपनीकडे घरगुती वस्तू, सौंदर्य प्रसाधनांसह अन्य वस्तू विकण्याचा परवाना असणार आहे.

या रेल्वेत खाद्य पदार्थ, सिगारेट, गुटखा आणि दारु विकण्याची परवानगी नसेल. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत या वस्तू विक्रीला असतील. गणवेश घातलेल्या दोन कर्मचाऱ्यांकडे ही जबाबदारी असेल. प्रवासी डेबिट किंवा क्रेडिट कार्डने केलेल्या सामानाचे पैसे भरु शकतील. प्रथमत: दोन रेल्वेत प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरु करण्यात येईल. त्यानंतर दोन-दोन रेल्वेंना या सेवेत जोडलं जाईल.