Covid-19 Cases Update : भारतात कोरोनाचा कहर अद्याप कमी झालेला नाही. दररोज जवळपास 10 हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 10 हजार 229 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी केवळ केरळमध्ये 5,848 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 44 लाख 47 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 63 हजार 655 रुग्णांना मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 38 लाख 49 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास सव्वा लाख आहे. म्हणजेच, एकूण 1 लाख 34 हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत. 




राज्यात काल (रविवारी) 999 नव्या रुग्णांची भर तर 49 रुग्णांचा मृत्यू


राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये चढ-उतार कायम असून शनिवारी दिवसभरात 999 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर एक हजार 20 रुग्ण बरे होऊन घरी गेले. गेल्या 24 तासांत राज्यात 49 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या हजारांच्या आत आलेली दिसत होती. ती पुन्हा एकदा हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचं दिसतंय.


राज्यात आजपर्यंत एकूण 64,66,913 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.64 टक्के एवढे झाले आहे. .सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,38,63,284  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  66,23,344 (10.37  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1,19,432 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1028 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


मुंबईत 100 टक्के नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस


मुंबईत लसीकरणाने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मुंबईत कोरोना लसीच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मुंबईत शुक्रवारपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचं 99.99 टक्के लसीकरण पूर्ण झाले होते, ते आज 100 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबईत आतापर्यंत 92 लाख 36 हजार 500 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. यामध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील कामगिरीचाही समावेश आहे. त्यामुळे हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जातोय. 


मुंबई शहराची इतकी मोठी लोकसंख्या असताना, अतिशय कमी वेळेत मुंबई महापालिका प्रशासन आणि मुंबईकरांनी एकत्रितपणे ही कामगिरी केलीय. इतका मोठा टप्पा गाठला तरी लसीकरण थांबलेले नाहीये. मुंबईच्या बिकेसी येथील जम्बो लसीकरण केंद्रात आजही लसीकरण सुरूच आहे. दुसरीकडे 65 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेत. पुढील काही दिवसात मुंबईतील 70 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असतील. त्यामुळे टास्क फोर्स नुसार मुंबई सेफ झोन मध्ये जाईल. त्यानंतर राज्य सरकार आणखी काही निर्बंध शिथिल करण्याची शक्यता देखील आहे. मुंबई सोडली तर इतर शहरांमध्ये मात्र अजूनही लसीकरणाचा हवा तसा वेग बघायला मिळत नाही.