नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या उज्वला योजनेच्या अंतर्गत आता शेगडीसाठी कुणालाही भटकावं लागणार नाही. गॅस शेगडी एजन्सीमधूनच मिळू शकेल आणि तेही मोफत. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे रोजीच केला होता.

 

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना आता केवळ गॅस कनेक्शनच नव्हे, तर गॅस शेगडीही दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या उज्वला योजनेच्या अंतर्गत बीपीएल कार्ड धारकांना गॅस एजन्सीकडून अतिशय साध्या प्रक्रियेच्या माध्यमातून शेगडी मिळणार आहे. यासाठी नोंदणीही सुरु झाली आहे.

 

संबंधित बातमी : आता एलपीजी गॅस सिलेंडरचे पैसेही ऑनलाईन भरा



चुलीच्या धुरामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील 5 कोटीहून अधिक कुटुंबीयांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्याची योजना आणली. 1 मे रोजी बलियामध्ये उज्वला योजनेचं उद्घाटन केलं. या योजनेनुसार बीपीएल कार्ड धारकांना गॅस कनेक्शनसोबत शेगडीही दिली जाणार आहे. देशातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती पाहता केंद्र सरकारने गॅस एजन्सीना हा आदेश दिला आहे.

 

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, बीपीएल कार्डधारकांना शेगडी देताना पैसे घेतले जाणार नाहीत. एजन्सीमधील शेगडीची किंमत 990 रुपये असते, त्यामुळे ही रक्कम सबसिडीच्या माध्यमातून हफ्त्यांमधून आकारली जाईल. उज्वला योजनेच्या माध्यमातून याची नोंदणीही सुरु झाली आहे. शिवाय, कोणतीही अनामत रकमेऐवजी बीपीएल कार्डधारकांना गॅस शेगडी देण्याचे आदेशही केंद्राने दिले आहेत.