नवी दिल्ली : नोटाबंदी हे भ्रष्टाचाराविरोधातील लढाईचं शेवटचं नाही तर पहिलं पाऊल आहे. यापुढे भ्रष्टाचाराविरोधात अनेक निर्णय घ्यायचे आहेत, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत विरोधकांचा समाचार घेतला.


याशिवाय बेहिशेबी संपत्तीविरोधात कडक कायदा करण्याचे संकेतही यावेळी मोदींनी यावेळी दिले.

विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, आमच्यासाठी पक्षापेक्षा देश मोठा आहे. तर त्यांच्यासाठी देशापेक्षा पक्ष मोठा आहे. फक्त निवडणुका जिंकणं महत्वाचं नाही तर देशाचा विकास महत्त्वाचा आहे.

नरेंद्र मोदींनी या बैठकीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा एक किस्सा सांगून काँग्रेसवर शरसंधान साधलं. "1971 मध्ये नोटाबंदीची गरज होती, ती आम्ही आज केली. त्यावेळी निवडणुकीसाठी नोटाबंदीचं काम थांबवण्यात आलं होतं. इंदिरा गांधी सरकारचे अर्थमंत्रीही नोटाबंदीच्या निर्णयाच्या बाजूने होते. जर तेव्हा नोटाबंदी झाली असती तर आज देश बर्बाद झाला नसता," असं मोदी म्हणाले.