श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका बँकेवर दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. दरोड्यात तब्बल 11 लाख रुपयांची लूट झाल्याची माहिती आहे. नोटाबंदीनंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी दरोडा टाकल्याची ही तिसरी वेळ आहे.


जम्मू काश्मीर बँकेच्या रंतीपुरा शाखेवर गुरुवारी हा दरोडा टाकला गेला. लूट करणाऱ्या दहशतवाद्यांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. मात्र 11 लाख रुपयांवर त्यांनी डल्ला मारल्याचं स्पष्ट झालं आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र स्थानिकांनी त्यांच्यावरच दगडफेक केली. लुटलेल्या रोकडीपैकी 16 हजार रुपयांची रक्कम चलनातून बाद झालेल्या नोटांच्या स्वरुपातले आहे. मात्र उर्वरित 10 लाख 84 हजारांच्या नोटा वैध स्वरुपातील आहेत.