नवी दिल्ली:  500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयावरुन राजकारणाने चांगलाच जोर धरला असून, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधांनाच्या निर्णयाविरोधी सूर लावला आहे. पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द होणार असल्याची माहिती भाजपवाल्यांना दोन महिने आधीच मिळाली होती, असा गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे.


विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेत एक रिपोर्ट दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.

बँकांच्या डिपॉझिटच्या टक्केवारीत मोठी वाढ

''नोटा बदलाचा निर्णय 8 नोव्हेंबरच्या रात्री जाहीर झाला. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातच अनेक बँकांच्या डिपॉझिटच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली. त्यामुळे डिपॉझिट करणारे नेमके कोण होते,'' असा प्रश्न केजरीवाल यांनी या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित केला.

याशिवाय 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या नावावर एक मोठा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, ''पंतप्रधानांनी जेव्हा नोटा रद्द करण्यासंदर्भातील घोषणा केली, त्यापूर्वीच ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्या सर्व मित्रांना सतर्क केले होते.''

मोदींचे सर्जिकल स्ट्राईक सर्व सामान्य जनतेच्या पैशांविरोधात

ते पुढे म्हणाले की, ''मोदींच्या सर्व मित्रांनी आपला काळा पैसा योग्य पद्धतीने दडवला असून, पंतप्रधानांचे सर्जिकल स्ट्राईक काळ्या पैशांविरोधातील नसून ते सर्व सामान्य जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशाविरोधात आहे.''

केजरीवाल भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत: भाजप

केजरीवालांच्या या आरोपांवर भाजपकडूही प्रतिक्रीया येत आहे. ''अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचा विरोध करुन काळा पैसा दडवणाऱ्या आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत आहेत. एकीकडे ते भ्रष्टाचार विरोधी असल्याचे दाखवतात, पण दुसरीकडे भ्रष्टाचाराला आळा घालणाऱ्या निर्णयाला विरोध करतात,'' असा आरोप भाजपच्यावतीने करण्यात येत आहे.

केजरीवाल अफवाच पसरवू शकतात: मुख्तार अब्बास नकवी

केजरीवालांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ''केजरीवाल हे अफवा पसरवण्याशिवाय दुसरं काही करु शकत नाहीत.'' त्यांच्याकडून अफवा पसरवण हा एक विनोद असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लागावला.