नोटाबंदीला महिना होत आला तरी परिस्थिती निवळलेली नाही किंवा बँकांमध्ये पुरेशी रोकड नसल्याने लोकांच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. हे सरकारचं पूर्णपणे अपयश असून, त्यावर मात करण्यासाठी पेटीएमच्या माध्यमातून कॅशलेस किंवा डिजीटल व्यवहार करण्याचा सल्ला दिला जात असल्याचं ते म्हणाले. मात्र पेटीएम हे दुसरं तिसरं काही नसून पेटीएम म्हणजे पे टू मोदी असल्याचं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदी नोटंबंदीच्या निर्णयाला खूप धाडसी निर्णय म्हणत असले तरी प्रत्यक्षात हा एक आत्मघाती आणि देशाला संकटाच्या खाईत लोटणारा निर्णय असल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं.
सरकारने आधी सांगितलं की नोटाबंदीचा निर्णय काळ्या पैशाविरोधात आहे, मात्र काळा पैसा एक महिन्याभरानंतरही सापडला नाही म्हणून सरकारने वेगवेगळ्या कारवाईचे इशारे द्यायला सुरूवात केली. त्यानंतर अतिरेक्यांना होणारा वित्तपुरवठा थांबवण्यासाठी हा निर्णय असल्याचा दावा करण्यात आला, पण प्रत्यक्षात अतिरेकी कारवाया थांबल्या नाहीतच, उलट अतिरेक्यांकडेच नव्या दोन हजारांच्या नोटा सापडल्या. त्यामुळेच आता कॅशलेस व्यवहार करण्याचा नवा सल्ला दिला जातोय. त्याचाही मूळ हेतू दुसराच असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
पंतप्रधान वेगवेगळ्या गावात, शहरात आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपली मते मांडत आहेत, पण त्यांना जिथे आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे, त्या संसदेतच ते वारंवार अनुपस्थित राहात आहेत. काही ठराविक लोकांनाच फायदा मिळवून देण्यासाठी नोटाबंदीची योजना राबवण्यात आल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्षांनी केला.