नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं आणि काँग्रेसचं अधिकृट ट्विटर हँडल अमेरिकासह पाच देशांमधून हँक झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. आक्षेपार्ह ट्विट केल्यानंतर काँग्रेसने दिल्ली आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दिली होती.

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेला ट्विटरकडून लॉग इन आयपीच्या आधारे पाच देशांमधून ट्विटर हॅक केल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये स्वीडन, रोमानिया, अमेरिका, कॅनडा, थायलंड या पाच देशांमधून ट्विटर अकाऊंट हॅक करुन अपमानजनक माहिती ट्विट करण्यात आले होते.

या पाचही देशांच्या संबंधित विभागाला आयपीच्या आधारे माहिती देण्यासाठी विनंती केली असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. 30 नोव्हेंबरला रात्री सव्वा 9 ते साडे 9 या दरम्यान आणि 1 डिसेंबरला सकाळी साडे 10 वाजता अकाऊंट हॅक  करण्यात आलं होतं, असं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.

पोलिस काँग्रेसच्या वेबसाईटच्या लॉगचाही तपशील घेणार आहेत. संबंधित देशांमधून मदत न मिळाल्यास त्या देशांमधील कोर्टामध्ये जाणार असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली होती.