श्रीनगर : जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला यांनी भारत-पाकिस्तान फाळणीबाबत वक्तव्य करुन वाद उकरुन काढला आहे. फाळणीला जिना नाही, तर पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल कारणीभूत आहेत, असं वक्तव्य फारुक अब्दुल्लांनी केलं.
जिना यांनी पाकिस्तानाची निर्मिती केली, असं जग मानतं, मात्र त्यात तथ्य नाही. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यामुळे भारताचं विभाजन झालं आणि पाकिस्तानचा जन्म झाला, असं अब्दुल्ला म्हणाले. जम्मूतील 'चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'ने चेंबर हाऊसमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
'देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेगळं मुस्लिम राष्ट्र तयार करण्याचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा एका आयोगाची स्थापना करण्यात आली. भारताचं विभाजन करण्याऐवजी अल्पसंख्याकांना विशेष अधिकार देण्याचा शिफारस या आयोगाने केली. जिनांनी आयोगाची शिफारस मान्य केली. पाकिस्तानाच्या निर्मितीच्या निर्णयापासून ते मागे फिरले, मात्र जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल आणि मौलाना आझाद यांना हा निर्णय मान्य नव्हता' असा दावा फारुक अब्दुल्लांनी केला.
'त्यावेळी तिरस्काराची बीजं पेरली गेली, मात्र त्याची किंमत आजपर्यंत देशाला चुकवावी लागत आहे. धर्म, जात आणि क्षेत्र यांच्या आधारावर आपण कधीपर्यंत लोकांमध्ये फूट पाडत राहणार?' असा सवालही फारुक अब्दुल्लांनी उपस्थित केला.
राजकीय पक्ष खुर्ची वाचवण्यासाठी लोकांमध्ये धर्म आणि क्षेत्राच्या आधारे दुही माजवत आहे. काश्मिरमध्ये पीडीपी 'अल्ला'च्या नावे मतं मागते, तर जम्मूत भाजप 'रामा'च्या नावावर. जर वरच्याने (देव) माणसाची निर्मिती करताना फरक केला नाही, तर धर्माच्या आधारे त्यांच्यात फूट पाडणारे आपण कोण? असा प्रश्नही अब्दुल्लांनी विचारला.