Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे. शहरातील टोल रद्द केला जाईल असी घोषणा नितीन गडकरी यांनी राज्यसभेत केली आहे. त्यांचा हा निर्णय मोठा मानला जात आहे. शहरातील लोकांना 10 किलोमीटरच्या रस्त्याचा वापर करण्यासाठी 75 किलोमीटर रस्त्याचा टोल द्यावा लागतो. त्यामुळं ही पद्धत बदलण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यसभेत खासदारांनी टोलबाबत काही प्रश्न विचारले होते. त्यांच्या या प्रश्नांना उत्तर देताना नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळं आता शहरातील टोल रद्द होणार आहे. देशातील टोल नाक्यांचा जनक मीच असल्याचे देखील गडकरी यावेळी म्हणाले. आम्ही 1990 च्या दशकात महाराष्ट्रात पहिल्यांदा मंत्री असताना त्या तत्त्वावर महामार्ग बांधल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच आता आपण नवी पद्धत आणत आहोत. त्यामुळं शहरी भागातील लोकांना टोल भरण्यातून वगळलं जाईल, अशी माहिती नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
राज्यसभेत बोलताना नेमकं काय म्हणाले गडकरी
सुदैवाने किवा दुर्दैवानं मी या टोलचा 'फादर ऑफ टोल टॅक्स' आहे. मीच या देशात बीओटीचा सगळ्यात पहिला प्रकल्प राबवला होता. तो प्रकल्प म्हणजे ठाणे भिवंडी या दरम्यानचा असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. मात्र, आता आम्ही नवीन पद्धत सुरु करत आहोत. आम्ही आता शहरातील टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण 10 किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांना 75 किलोमीटरचा टोल द्यावा लागत असेल तर ते चुकीचे असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. पण यामध्ये माझी काही चूक नाही. ही गोष्ट दुरुस्त करण्याची गरज असल्याचं गडकरींनी सांगितले. मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टींशी मी सहमत असल्याचंही गडकरींनी सांगितले.
दरम्यान, आगामी काळात सर्व टोल प्लाझा हटवले जातील. म्हणजेच रस्त्यावर आता कोणतीही टोल लेन नसेल. टोल वसूल करण्यासाठी GPS आधारित ट्रॅकिंग सिस्टम तयार केली जात आहे. ज्यात तुम्ही टोल प्लाझा पार केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कापली जाईल. यासाठी सरकार लवकरच एक धोरण आणणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी मार्च 2022 मध्ये दिली होती. तसेच लोकांच्या सुविधेसाठी टोल लेन रद्द केली जाईल. त्याऐवजी नॅशनल हायवेवर दर 60 किमीच्या अंतरावर एक टोल प्लाझा असेल. तसंच मध्येच असलेले सर्व टोल पुढील तीन महिन्यात हटवले जातील. टोल प्लाझा हटवले गेल्याने प्रवाशांना कुठेही टोल भरण्यासाठी थांबावं लागणार नाही अशी माहिती त्यांनी मार्च महिन्यात दिसी होती. तसेच लोकांचा वेळही वाचण्यास मदत होईल.
महत्त्वाच्या बातम्या: