Situation in Northeast : ईशान्य भारतात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूर आला आहे. या पूरस्थितीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आसाम, त्रिपुरा, मणीपूर, मिझोराम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसानंतर या भागात पूर आणि भूस्खलनामुळं मोठं नुकसान झालं आहे. या पुरामुळं लाखो लोक प्रभावित झाले आहेत. तर अनेक लोक बेघर झाले आहेत. तर अनेकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं उद्धवस्त झाली असून, रस्ते  रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 


आसाम आणि मेघालयमध्ये पूर आणि भूस्खलनात 31 जणांचा मृत्यू 


मुसळधार पावसामुळं ईशान्य भारतात मोठं नुकसान झालं आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.  अनेक लोक मदत छावण्यांमध्ये राहून ही आपत्ती शांत होण्याची वाट बघत आहेत. आसाम आणि मेघालयमध्ये गेल्या दोन दिवसात पूर आणि भूस्खलनात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील 28 जिल्ह्यांमध्ये सुमारे 19 लाख लोक प्रभावित झाले आहेत, तर सुमारे एक लाख लोक मदत केद्रात आहेत. पुरामध्ये झालेल्या एकूण मृतांपैकी 12 आसाममध्ये तर 19 जणांचा मेघालयात मृत्यू झाला आहे. त्रिपुराची राजधानी आगरतळा येथेही भीषण पूर आल्याची माहिती आहे. शहरात अवघ्या 6 तासात 145 मिमी पाऊस झाला आहे.



आसाम


आसाममध्ये जवळपास 3,000 गावे जलमय झाली असून 43,000 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. अनेक बंधारे, कल्व्हर्ट आणि रस्ते खराब झाले आहेत. होजई जिल्ह्यात पूरग्रस्त लोकांना घेऊन जाणारी बोट बुडाली, तीन मुले बेपत्ता झाली तर 21 जणांना वाचवण्यात यश आले. आसाम सरकारने पूर आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या लोकांसाठी गुवाहाटी आणि सिलचर दरम्यान विशेष विमानांची व्यवस्था केली आहे.


मेघालय


मेघालयमध्ये आलेल्या पुरामुळं खळबळ उडाली आहे. दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यातील बाघमारा येथे तीन आणि सिजू येथे भूस्खलनामुळं एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांना मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी भरपाई जाहीर केली आहे.


त्रिपुरा


त्रिपुरामध्ये संततधार पावसामुळं आलेल्या पुरामुळं राज्यात 10,000 हून अधिक लोक बेघर झाले आहेत. त्यामुळं गेल्या एक महिन्यापासून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग-6 वर मुसळधार पावसामुळं झालेल्या भूस्खलनामुळं अनेक भागांचा संपर्क तुटला होता. पुराचा क्रोध पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील आगरतळा आणि त्याच्या शेजारील भागात मर्यादित आहे. हावडा नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. 


अरुणाचल प्रदेश


शेजारच्या अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी बांधण्यात आलेले धरण भरले आहे. मेघालय, आसाम, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये एकाकी ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. नागालँड आणि त्रिपुरामध्ये जोरदार अतिवृष्टीची नोंद झाली आहे.



मणिपूर


मणिपूरमधील इंफाळमध्ये पुराच्या पाण्यामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर एकूण मृतांची संख्या सात झाली आहे. थौबल, इंफाळ पश्चिम आणि बिष्णुपूरमधील परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. राज्यातील पूरग्रस्त भागात अजूनही मोठ्या प्रमाणात लोक अडकले आहेत. राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या घरांची संख्या 22 हजार 624 झाली असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.


मिझोराम


मिझोराममधील पुरामुळे आतापर्यंत 1 हजार 66 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. दक्षिण मिझोराममधील लुंगलेई जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे. तालाबुंग शहर आणि जवळपासची गावे पुराच्या विळख्यात आहेत. पुरामुळे अनेक ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालं आहे.


मौसिनराम आणि चेरापुंजी इथं विक्रमी पाऊस 


मेघालयातील मौसिनराम आणि चेरापुंजी विक्रमी पाऊस पडला आहे. आगरतळा येथे गेल्या 60 वर्षांतील हा तिसरा सर्वाधिक पाऊस आहे. अचानक आलेल्या पुरामुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.