गुजरातमधून आतापर्यंत दीड हजारांपेक्षा जास्त उत्तर भारतीयांचं पलायन
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2018 09:53 PM (IST)
एका 14 महिन्याच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी एका बिहारच्या व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर हे हल्ले सुरु झाले आहेत. उत्तर भारतीयांनी आता गुजरातमधून काढता पाय घेतला आहे.
अहमदाबाद : गुजरातमध्ये परप्रांतियांवर होणाऱ्या हल्ल्यांवरुन वातावरण तापलं आहे. एका 14 महिन्याच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी एका बिहारच्या व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर हे हल्ले सुरु झाले आहेत. या धास्तीने आतापर्यंत हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीयांनी गुजरातमधून पलायन केलं आहे. गुजरात पोलिसांनी या हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत 42 ठिकाणी गुन्हे दाखल केले असून 342 जणांना अटक केली आहे. अहमदाबाद, मेहसाणा, साबरकांठा या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय सोशल मीडियावरुन भडकाऊ मेसेज वायरल करणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. पोट भरण्यासाठी गुजरातमध्ये आलेल्या उत्तर भारतीयांवर हल्ले सुरु आहेत. त्यामुळेच उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील लोक आता गुजरात सोडत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्या बस आणि ट्रेन भरुन जात आहेत.