Non AC Vande Bharat Express : पहिली नॉन-एसी वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे (Railway) मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यामुळे अगदी स्वस्तार आरामदायी प्रवास आता करणं शक्य होणार आहे. तसेच या वर्षात दोन नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे. ICF चेन्नईकडून वंदे भारत नव्या स्वरुपात आणण्याची योजना आखण्यात येत आहे. दरम्यान, वेगाने, आरामदायी आणि अगदी वाजवी दरात प्रवाशांना प्रवास करता येण्यासाठी ही नॉन एसी वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 


रचनेमध्ये थोडा बदल होणार पण सुविधा त्याच


आता धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसची बाह्य रचना ही थोडी वेगळी असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण यामध्ये आरामदायी प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नसल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. तसेच यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा देखील उपलब्ध असणार आहे. या गाड्यांमध्ये फायर अलार्म सिस्टीम, इमर्जन्सी अलार्म या सुविधा असणार आहे. तर या ट्रेनमधील टॉयलेट देखील वंदे भारत एक्सप्रेस सारखेच असणार आहेत. दोन डब्यांमध्ये जर्क-फ्री प्रवास करण्यासाठी सुधारित कपलर देखील असणार आहे. या ट्रेनला एलएचबी कोच असणार आहेत. 


एसी वंदे भारत पेक्षा वेग कमी


एसी वंदे भारतपेक्षा नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा वेग कमी असणार आहे. नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा ताशी वेग हा 130 किमी असणार आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेसचा वेग हा ताशी 160 किमी इतका आहे. यावर बोलतांना रेल्वे मंत्रालयाने म्हटलं की, रेल्वेच्या खिडक्या उघड्या असताना जास्त वेगाने रेल्वे चालवणे हे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे या रेल्वेचा वेग एसी वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा कमी ठेवण्यात आला आहे. 


सध्या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर सामान्य लोकांच्या खिशाला परवडत नसल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून रेल्वे मंत्रालयाकडून सामान्य लोकांसाठी ही नॉन एसी वंदे भारत रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. तसेच यामुळे अगदी वाजवी दरात प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये स्लिपर कोचची देखील सुविधा देण्यात येणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Vande Bharat Express : कोल्हापूरकरांचे वंदे भारत एक्स्प्रेसचे स्वप्न पूर्ण होणार! राज्यातील पाचवी वंदे भारत मुंबई-कोल्हापूर मार्गावर धावणार