नवी दिल्ली : कार्यालयात सहकारी महिलांचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपातून तात्पुरतं निलंबन केलेल्या आयटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 35 वर्षीय स्वरुप राजचा मृतदेह नोएडातील राहत्या घरी आढळून आला होता.
स्वरुपविरोधात तक्रार करणाऱ्या काही सहकाऱ्यांविरोधात पोलिस आत्महत्येस प्रवृ्त्त केल्याची तक्रार दाखल करत आहेत. यामध्ये दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
नोएडा सेक्टर 137 मधील उच्चभ्रू वसाहतीत स्वरुपने फॅनला लटकून गळफास घेतला होता. स्वरुपच्या पत्नीला त्याचा मृतदेह आढळला होता. त्याशिवाय पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे.
एका प्रसिद्ध कंपनीत स्वरुप राज असिस्टंट वाईस प्रेसिडंट म्हणून कार्यरत होता. दोन कर्मचाऱ्यांनी त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.
'माझ्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. मात्र कोणाला सामोरं जाण्याची माझी हिंमत नाही. मी निर्दोष सुटलो तरी लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कधीच बदलणार नाही.' असं स्वरुपने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
'माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. तू आणि आपल्या कुटुंबाने माझ्यावर विश्वास दाखवायला हवास. माझ्या निर्दोषत्वाविषयी कंपनीला नक्की सजेल. तू खंबीर राहा. समाजात पूर्णपणे मानाने जग. तुझ्या नवऱ्याने काहीच केलं नाही, अशी वाग' असंही स्वरुपने पत्नीला उद्देशून लिहिलं आहे.
स्वरुपने 2007 साली संबंधित कंपनी जॉईन केली होती. दोनच वर्षांपूर्वी तो विवाहबंधनात अडकला होता. नुकतीच त्याची पदोन्नती वरिष्ठ पदावर झाली होती. मात्र लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर तक्रार निवारण समितीने त्याला तात्पुरतं पदापासून दूर ठेवलं होतं.
लैंगिक छळाच्या आरोपांनंतर आयटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2018 01:32 PM (IST)
मी निर्दोष सुटलो तरी लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कधीच बदलणार नाही, असं सुसाईड नोटमध्ये लिहून स्वरुप राजने आत्महत्या केली
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -