मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वाबाबतच्या चर्चांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पडदा टाकला आहे. "मी जिथे आहे तिथे खूश आहे," असं स्पष्टीकरण नितीन गडकरी यांनी दिलं आहे. त्यामुळे 2019 मध्ये पंतप्रधानपदाचा चेहरा होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं आहे. शिवाय मोदी पुन्हा एकदा निवडणुकीत विजय मिळवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


"2019 मध्ये भाजपला विजय हवा असेल तर भाजपचे नेतृत्त्व नितीन गडकरी यांच्याकडे सोपवा," अशी मागणी शेतकरी नेते आणि महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली होती. या संदर्भात त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैयाजी जोशी यांना पत्र पाठवलं होतं.

2019 मध्ये विजय हवा तर नेतृत्त्व गडकरींकडे सोपवा : किशोर तिवारी

याविषयी विचारलं असता नितीन गडकरी म्हणाले की, "या मागणीचा कोणताच आधार नाही. सध्या मी जिथे आहे तिथे खूश आहे. मला आधी गंगेचं काम पूर्ण करायचं आहे. चारधाम आणि इतर स्थळांसाठी उत्तम रस्ते बनवणं माझं प्राधान्य आहे. ही कामं करण्यात मी आनंदी आहे आणि ती लवकर करायची आहेत."

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का सहन करावा लागला होता. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तांतर झालं. त्यानंतर पंतप्रधान मोदी लाट ओसरल्याची चर्चा सुरु झाली होती. "राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी", असे मेसेजही सोशल मीडियावर फिरले. त्यामुळे भाजपचं नेतृत्त्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात यावं, अशी मागणी किशोर तिवारी यांनी सरसंघचालकांकडे केली होती.