नवी दिल्ली : उरीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर दिवसभर दिल्लीत घडामोडींना वेग आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी हल्लाची माहिती राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना दिली. राष्ट्रपती भवनात जाऊन मोदींनी प्रणव मुखर्जींना माहिती दिली.


याशिवाय पाकिस्तानविरोधात कारवाई कऱण्यास केंद्राने हिरवा कंदील दिल्याची माहितीही समोर येते आहे. याशिवाय पाकिस्तानवर कारवाईचा निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल. त्यानंतर निर्णय होणार आहे.

लवकरच सर्वपक्षीय बैठक

 

केंद्र सरकार लवकरच सर्वपक्षीय बैठक घेणार आहे. उरीमधील दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानवर कारवाईबाबत या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

उरीमध्ये दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 18 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामुळे महाराष्ट्राचंही अतोनात नुकसान झालं आहे. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या 18 जवानांपैकी 4 जवान महाराष्ट्रातले आहेत.

दहशतवादी पाकिस्तानीच!

 

उरीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केला असून, ठार झालेले चारही दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे असल्याचं समोर आलं आहे. तसंच या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर आणि त्याचा भाऊ रौफ असगर असल्याची माहिती समोर येते आहे.

12 दहशतवादी काश्मीरमध्ये मोकाट

 

या हल्ल्यासाठी एकूण 16 अतिरेक्यांची टोळी भारतात घुसल्याचं लष्करानं मान्य केलं. त्यामुळे अजूनही 12 अतिरेकी हे काश्मीरमध्ये मोकाट असू शकतात, अशी माहितीही लष्करानं दिली आहे.