मुंबई : देशातील बँकांना जवळपास 9 हजार कोटींचा चुना लावणाऱ्या उद्योगपती विजय मल्ल्या यांची कंपनी किंगफिशर एअरलाईन्सला कर्ज देणाऱ्या 17 बँकां कंपनीच्या ब्रँड आणि ट्रेडमार्कचा लिलाव करत आहेत. मात्र, पुन्हा एकदा या ब्रँड आणि ट्रेडमार्कला खरेदी करण्यासाठी कुणीही पुढे आलेला नाही.

 

बँकांनी लिलावादरम्यान ब्रँड, ट्रेडमार्कची किंमत 366.77 कोटी रुपये एवढी ठेवली. याआधी किंगफिशर हाऊस विकण्याचाही बँकांनी प्रयत्न केला. किंगफिशरच्या लोगोसोबत ‘फ्लाय द गुड टाईम्स’ ही टॅगलाईन, फ्लाईंग मॉडेल्स, फनलाईनर, फ्लाय किंगफिशर, फ्लाईंग बर्ड डिव्हाईस यांचाही लिलावात समावेश करण्यात आलं होतं.

 

कर्ज घेताना किंगफिशर एअरलाईन्सने ट्रेडमार्क गहाण ठेवलं होतं. किंगफिशर ब्रँडचं ऑनलाईन ऑक्शन  बँकांसाठी एसबीआय कॅप ट्रस्टी कंपनीने केलं. लिलावाची प्रक्रिया सुरुवात सकाळी 11.30 वाजता सुरु झाली आणि एक तास सुरु राहिली. ट्रेडमार्कसाठी 366.70 कोटी रुपये रिझर्व्ह प्राईज ठेवण्यात आली. या रिझर्व्ह प्राईजच्या 10 टक्क्यांपर्यंतही बोली पोहोचली नाही.

 

मार्केट एक्स्पर्ट्सच्या मतांनुसार, लिलावामध्ये खरेदीदार येणं अशक्य आहे. कारण ब्रँडची मार्केट व्हॅल्यु कमी झालीआहे. विजय मल्ल्या हे किंगफिशर एअरलाईन्स चालवत होते. या कंपनीचा तोटा वर्षागणिक वाढत होता. शिवाय, ते बँकांकडून कर्जही घेत होते. त्यांच्यावर सध्या सुमारे 9 हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज आहे. किंगफिशरचं ट्रेडमार्क सीज केलं आहे. मात्र, पूर्ण वसुली अद्यापही झालेली नाही.