Cyclone Vayu | गुजरातकडे सरकणाऱ्या वायू वादळाने दिशा बदलली!
वायू वादळ गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता काहीशी कमी झाली आहे.
Continues below advertisement
अहमदनगर : ज्या वायू वादळाने अनेकांच्या मनात धडकी भरवली आहे, त्या वायूने आपली वाट बदलल्याची माहिती समोर आली आहे. 135 ते 145 किमी प्रति तास वेगाने येणाऱ्या वायू वादळाने आज (13 जून) सकाळी आपली दिशा थोडी बदलली आहे. त्यामुळे हे वादळ गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता काहीशी कमी झाली आहे.
भारतीय हवामान विभाग आणि खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अंदाजानुसार, वायू वादळाचा सध्याचा प्रवास किनाऱ्यापासून दुसऱ्या बाजूला सुरु झाला आहे. त्यामुळे हे वादळ थेट समुद्रकिनाऱ्याला न धडकता पोरबंदर, द्वारकाच्या जवळून जाईल. परंतु याचा परिणाम गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याजवळच्या परिसरात दिसेल. इथे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल.
लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं
मात्र वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तब्बल दहा लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. तसंच एनडीआरएफने आपल्या 52 पथकांना मदत आणि बचाव कार्यासाठी आधीच तैनात केलं आहे.
58 ट्रेन आणि बस वाहतूकही रद्द
केंद्र आणि राज्य सरकारने वादळामुळे अनेक सार्वजनिक वाहतूक सेवा रद्द केल्या आहे. पश्चिम रेल्वेने गुजरातच्या किनारपट्टीवरुन जाणाऱ्या 58 ट्रेन 15 जूनपर्यंत रद्द केल्या आहे. 15 जूनपर्यंत वादळाची तीव्रता जास्त असल्याचा अंदाज आहे. सोबतच गुजरात परिवहनची बस सेवाही रद्द करण्यात आली आहे.
हवाई वाहतुकीवरही परिणाम
वायू वादळाचा फटका हवाई वाहतुकीलाही बसला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने बुधवार रात्रीपासून गुरुवार रात्रीपर्यंत पोरबंदर, दीव, भावनगर, केशोड आणि कांडलामध्ये विमान उड्डाणं रद्द केली आहेत.
Continues below advertisement