नवी दिल्ली : हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये आता फुल प्लेट भाजी घेणं बंधनकारक नसेल. हाफ किंवा पाव प्लेट भाजी देण्याबाबत केंद्रीय अन्न मंत्रालयानं एक मसुदा तयार केला असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

सध्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी फुल प्लेट भाजी घेणं सक्तीचं असतं. त्यामुळे जर तुम्ही एकटे जेवायला गेला असाल, तर अन्नाची नासाडी होण्याची शक्यता असते. शिवाय तुम्हाला फुल प्लेटचे पैसेही मोजावे लागतात. याच पार्श्वभूमीवर अन्न मंत्रालयानं हे पाऊल उचललं आहे.

केंद्राने या निर्णयाला मंजुरी दिल्यास यापुढे ग्राहकच राजा असेल, आणि हॉटेलचालकांच्या मनमानीला चाप बसेल. हाफ प्लेटची ऑर्डर दिल्यास हॉटेल मालकाला नाकारण्याचा पर्याय नसेल. महत्वाचं म्हणजे हाफ प्लेटसाठी पैसे देखील अर्धेच देता यावेत, याबाबतही विचार सुरु आहे.