तिरुवनंतपुरम: केरळमध्ये दुचाकी वाहनांचे वाढत्या रस्ते अपघातानं चिंतित असणाऱ्या राज्य सरकारन काल एक वेगळीच घोषणा केली आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी केरळ सरकारनं फारच नामी शक्कल लढवली आहे. ज्या दुचाकी चालकांकडे हेल्मेट नसेल त्यांना एक ऑगस्टपासून पेट्रोल दिलं जाणार नाही. अशी घोषणा केरळ सरकारनं केली आहे.


 
परिवहन आयुक्त तोमिन जे. तचनकारी म्हणाले की, 'हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिलं जाणार नाही. यासंबंधी पेट्रोलियम कंपनी आणि पेट्रोल पंप मालकांना आवश्यक असे आदेश जारी करण्यात आले आहेत.'

 

एक ऑगस्टपासून सगळ्यात आधी तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम आणि कोझिकोड येथे प्रायोगिक तत्वावर हा नियम लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर जिल्ह्यातही हा नियम लागू केला जाईल.

 

परिवहन आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तेल कंपन्या, डिलर आणि पेट्रोल पंप मालकांशी आमची चर्चा झाली असून विना हेल्मेट असणाऱ्या चालाकांना पेट्रोल न देण्याचे आदेश दिले आहेत.'

 

एक अधिकृत पत्रकात असं सांगण्यात आलं आहे की, केरळमध्ये रस्ते अपघातात 50 टक्के दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 80 टक्के लोकांना डोक्याला जबर मार लागल्यानं मृत्यू झाला आहे.