मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या 'कबाली' चित्रपटाची चर्चा सर्वांच्याच तोंडी ऐकायला मिळत आहे. रजनीच्या चाहत्यांनी चॉकलेटचा पुतळा उभारुन त्याला अनोखी भेट दिली असतानाच आता 'एअर एशिया'च्या विमानावरच थलैवाचा फोटो पाहायला मिळणार आहे.


 
मलेशियन एअरलाईन असलेल्या 'एअर एशिया'ने रजनीचा चेहरा विमानावर झळकवून त्याला मानवंदना दिली आहे. कबाली या वर्षातला सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट मानला जात असून रजनीकांतसोबत मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेही यात दिसणार आहे. कबाली चित्रपटाचा टीझर आणि पहिल्या गाण्याचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. कोट्यवधी प्रेक्षकांनी हा टीझर पाहिला असून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप वादात अडकली आहे.

 
एअर एशिया कबालीची ऑफिशिअल एअरलाईन पार्टनर आहे. चित्रपटात काही सीन्समध्ये हे विमान वापरण्यात आलं आहे. विमानाच्या बाह्य भागावर रजनीच्या डॉन अवतारातले चित्र रंगवून विमान कंपनीने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. या विमानाचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत.

 

 

https://twitter.com/galattadotcom/status/748210727282847746

 
बंगळुरु, नवी दिल्ली, गोवा, पुणे, चंदिगढ, जयपूर, गुवाहाटी, इम्फाळ, विझाग आणि कोची या शहरांमध्ये हे विमान प्रवास करेल. विशेष म्हणजे कबालीचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहता यावा म्हणून बंगळुरुच्या फॅन्सना चेन्नईत नेण्यासाठी एका विशेष विमानाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. कबाली हा चित्रपट 15 किंवा 22 जुलै 2016 रोजी प्रदर्शित होणार आहे.