No Confidence Motion Debate: मोदी सरकारच्या (Modi Government) विरोधात अविश्वास प्रस्तावावर आज संसदेत (Parliament) मतदान होणार आहे. या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्तानं मतदानात मोदींपेक्षा (PM Modi) जास्त कसोटी तर महाराष्ट्रातल्या पक्षांचीच होणार असं दिसतंय. कारण शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादीतल्या (NCP) फुटीनंतर पहिल्यांदाच संसदेत व्हिप अंतर्गत मतदानाची वेळ आली आहे. 


विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मोदी सरकारविरोधात आणला आहे, पण यासर्व घडामोडींमध्ये खरी परीक्षा होणार आहे महाराष्ट्रातल्या पक्षांचीच. आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावार मतदानात शिवसेना, राष्ट्रवादीच्या खासदारांची कसोटी लागणार आहे. दोन्ही पक्षांत दोन्ही बाजूंनी व्हिप काढले गेले आहेत. राष्ट्रवादीत एक व्हिप सुनील तटकरेंचा आहे, तर दुसरा लक्षद्वीपचे खासदार महमंद फेजल यांचा आहे. तटकरेंचा व्हिप सांगतो मोदींच्या बाजूनं अविश्वास प्रस्तावाविरोधात मतदान करा, तर दुसरीकडे फझल यांचा व्हिप सांगतो की, मोदी सरकारच्या विरोधात मतदान करा. 


खासदार नेमकं कुठल्या आदेशाचं पालन करणार हा प्रश्नच आहे. दहाव्या शेड्युलनुसार, म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यानुसार व्हिपचं उल्लंघन हा गंभीर गुन्हा ठरतो. सरळसरळ अपात्रतेच्या कारवाईसाठी हा मुद्दा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये  कोण कुठल्या बाजूनं मतदान करणार? याची उत्सुकता असेल.


अविश्वास प्रस्ताव मोदींविरोधात, परीक्षा मात्र महाराष्ट्राच्या खासदारांची


राष्ट्रवादीचे एकूण 5 खासदार लोकसभेत आहेत, त्यापैकी सुनील तटकरे एकटे अजित पवार गटाकडे तर इतर 4 सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, महम्मंद फैजल हे शरद पवार गटाकडे
सुनील तटकरे हे एकत्रित राष्ट्रवादीचे व्हिप होते, पण नंतर त्यांच्याऐवजी महम्मंद फजल यांची नियुक्ती शरद पवार गटानं केली
आता लोकसभा अध्यक्ष कुठल्या व्हिपला मान्यता देणार हा प्रश्न आहे. 
तिकडे शिवसेनेत शिंदे गटाच्या व्हिप भावना गवळी आहेत, ज्यांची व्हिप म्हणून नियुक्ती लोकसभा अध्यक्षांनी मान्य केलीय. 
त्यामुळे ठाकरे गटाचे 6 खासदार मतदान करताना या व्हिपचं उल्लंघन करणार का याची उत्सुकता आहे. 


दरम्यान, इतके दिवस आमदारांच्या अपात्रतेचा विषय राज्यात चर्चेत होता. आता अविश्वास प्रस्तावाच्या निमित्तानं संसदेत जे मतदान होईल त्यामुळे खासदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही चर्चेत येऊ शकतो. 


पंतप्रधान मोदी आज अविश्वास ठरावावर उत्तर देणार


लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत 8 ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात करताना विरोधकांचा अजेंडा मणिपूर असेल, असं स्पष्ट केलं होतं. तर बुधवारी (9 ऑगस्ट) राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पंतप्रधानांवर आक्रमकपणे हल्लाबोल केला. त्याला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार युक्तिवाद केला. आजही दोन्ही बाजूचे खासदार अविश्वास ठरावावरील चर्चेत सहभागी होणार आहेत. शेवटी, पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. 2018 मध्येही मोदींना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावं लागलं होतं. तेव्हाही विरोधकांकडे संख्याबळ नव्हतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी!