नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील जनतेला होळीचं गिफ्ट दिलं आहे. बचत खात्यामधून पैसे काढण्यासाठी आजपासून कोणतीही मर्यादा नसेल. बचत खात्यामधून रोकड काढण्याची मर्यादा संपली आहे.
इतकंच नाही तर विविध खात्यांमधून रोख रक्कमेवरील सर्व प्रकारची मर्यादा संपुष्टात येणार आहे. आतापर्यंत बचत खात्यामधून आठवड्याला जास्तीत जास्त 50 हजार रुपये काढता येत होते.
काळा पैसा आणि बनावट नोटांवर आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यामुळे 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द झाल्या होत्या.
यानंतर चलन तुटवड्यामुळे आरबीआयने बँक आणि एटीएममधून रोख रक्कम काढण्यावर अनेक मर्यादा घातल्या होता. परंतु चलन तुटवडा कमी झाल्याने वेळोवेळी या मर्यादा कमी करण्यात आल्या.
करंट अकाऊंट, ओव्हरड्राफ्ट आणि कॅश क्रेडिट अकाऊंटमधून रोकड काढण्याची मर्यादा 31 जानेवारीला संपली होती. तर आजपासून (13 मार्च) बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा संपली आहे.
1 फेब्रुवारीपासून बचत खात्यांमधून आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मुभा होती. यानंतर 20 फेब्रुवारीला ही मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती.
बँकांनी एटीएममधून काढणाऱ्या रोकडवरील मर्यादा वाढवून प्रतिदिन 10 हजार रुपये केली होती. पण बचत खात्यांसाठी आठवड्याला 24 हजार रुपयांची मर्यादा कायम ठेवण्यात आली होती.
नोटाबंदीनंतर एटीएममधून सुरुवातीला दररोज 2000 रुपये काढण्याची मुभा होती. त्यानंतर ती वाढवून 2500 रुपये करण्यात आली. ही मर्यादा 31 डिसेंबर 2016 रोजी रिव्हाईज केली आणि 1 जानेवारी 2017 पासून लागू झालेल्या नियमानुसार, एटीएमधून दररोज 4500 रुपये काढता येतील.