नवी दिल्ली : भाजपच्या विजयाच्या सेलिब्रेशननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संसदीय बैठक पार पडली. या बैठकीतही चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला नाही. मात्र, मुख्यमंत्रिपदी कुणाला बसवायचं, यासाठी पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली.


उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची जबाबदारी पर्यवेक्षक म्हणून भूपेंद्र यादव आणि व्यंकय्या नायडू पार पाडतील. तर नरेंद्र तोर आणि सरोज पांडे हे उत्तराखंडसाठी आणि पियूष गोयल हे मणिपूरसाठी पर्यवेक्षक म्हणून काम करतील. संसदीय मंडळाच्या बैठकीत भाजपने या नेत्यांवर मुख्यमंत्री निवडीची जबाबदारी टाकली आहे.

मात्र, पर्यवेक्षकांनी निवडलेल्या नावावर शिक्कामोर्तब करायचा की नाही, याचा अंतिम निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेच घेणार आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण असतील, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 16 मार्चला उत्तर प्रदेशातील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आहे. याच बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाईल.

दरम्यान, गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रिकर यांची निवड निश्चित झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत गोव्यात पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या विजयाच्या सेलिब्रेशनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप मुख्यालयात आले होते. मेरेडिन हॉटेलपासून मोदी पायी चालत भाजप मुख्यालयात पोहोचले आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.