मणिपूरमध्ये काँग्रेस नंबर वन, मात्र भाजपचा सत्तास्थापनेचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 13 Mar 2017 07:56 AM (IST)
इम्फाळ : गोव्याप्रमाणे मणिपूरमध्येही काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरला तरी भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला. नॅशनल पीपल्स पार्टी आणि लोक जनशक्ती पक्षाच्या पाठिंब्याच्या जोरावार भाजपनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मणिपूरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला भाजपने कडवी झुंज दिली. 31 आमदारांचं समर्थन असलेलं पत्र भाजप सरचिटणीस राम माधव यांनी मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांच्याकडे सादर केलं आहे. मणिपूरमध्ये काँग्रेसला 26 तर भाजपला 21 जागांवर विजय मिळवता आला आहे. 60 जागा असलेल्या मणिपूर विधानसभेत 31 ही मॅजिक फिगर आहे. नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) हे दोन्ही एनडीएचे घटकपक्ष आहेत. एनपीपीला मणिपूरमध्ये चार, तर एलजेपीला एक जागा मिळाली आहे. त्यामुळे भाजपचं एकूण संख्याबळ 26 वर गेलं आहे. एनडीएचा घटकपक्ष असलेल्या नागा पीपल्स फ्रंटसोबत समझोता करुन चार जागा मिळतील. तर आणखी एका आमदाराला सोबत घेऊन सत्तास्थापनेचा दावा करता येईल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. मणिपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा? भाजप – 21 काँग्रेस – 26 नागा पीपल फ्रंट – 4 नॅशनल पीपल्स पार्टी – 4 तृणमूल काँग्रेस -1 अपक्ष – 1 लोकजनशक्ती पार्टी – 1