नवी दिल्ली : बिहारमधील राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर आज नितीश कुमारांच्या जनता दल (यू.)ची बैठक झाली. या बैठकीत तेजस्वी यादव यांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सीबीआय कारवाईवर प्रामुख्याने चर्चा झाली. बैठकीत तेजस्वी यादव यांच्यावर कारवाईची मागणी पक्षातील सर्व नेत्यांनी नितीश कुमारांकडे केली असून, यावर नितीश कुमार तीन-चार दिवसांत निर्णय घेतील, असं जनता दल (यू.)चे ज्येष्ठ नेते रमई राम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.


बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं महागठबंधन असून, उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या बेहिशोबी मालमत्तांवर सीबीआयच्या कारवाईमुळे, या महागठबंधनचं भवितव्य धोक्यात आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही याप्रकरणी अजूनपर्यंत मौन बाळगलं आहे. त्यातच लालू प्रसाद यादव यांनी सोमवारी राजदच्या आमदारांची बैठक घेऊन, तेजस्वी यादव पदाचा राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलं. तर दुसरीकडे जेडीयूमध्ये तेजस्वी यादव यांच्यावर कारवाईसाठी नितीश कुमार यांच्यावर स्वपक्षीय दबाव वाढत आहे.

त्यातच भाजपनेही नितीश कुमार यांना मोठी ऑफर दिली आहे. तेजस्वी यादव यांना बरखास्त करा, आम्ही तुम्हाला बाहेरुन पाठिंबा देऊ असं सांगून बिहार भाजपचे अध्यक्ष नित्यानंद राय यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आज जनता दल (यू.)ची पक्ष कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील राज्यातील स्थिती, आणि आरजेडीसोबतच्या महागठबंधनासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनीही भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही असं स्पष्ट केल्याचं समजतं.

दरम्यान, आरजेडीच्या सोमवारच्या बैठकीपूर्वी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर फोनवर चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मिळू शकला नाही. पण तरी राज्यातील परिस्थितीवरच दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं आहे.

दुसरीकडे जेडीयूच्या आजच्या बैठकीनंतर आरजेडी आणि जेडीयूमध्ये मतभेद स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणी जर आरजेडीकडून निर्णय वेळीच घेण्यात आला नाही, तर महागठबंधनचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं. शिवाय, भाजपकडूनही जेडीयूला ऑफर असल्यानं, नितीश कुमार धाडसी निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

कसं आहे बिहारचं सत्ता समीकरण:

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. त्यामुळे इथं मॅजिक फिगर 122 आहे. बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची आघाडी आहे. या आघाडीत जेडीयू 71, आरजेडी 80 आणि काँग्रेसकडे 27 जागा आहे. म्हणजे एकूण 178  जागा आहेत. तर भाजपच्या 53 जागा आहेत.

अशावेळी जर आरजेडीनं पाठिंबा काढून घेतला तर जेडीयूच्या 71 जागा, भाजपच्या 53 आरएलएसपी आणि एलजेपी 2-2 आणि हम या पक्षाची 1 जागा (एकूण 129 जागा) मिळून नितीश कुमार सत्ता स्थापन करु शकतात.

संबंधित बातम्या

तेजस्वी यादवांना बरखास्त करा, आम्ही बाहेरुन पाठिंबा देऊ: भाजप

लालूंवर छापेमारी, नितीश कुमार सरकार संकटात