नवी दिल्ली : भाजप आणि जनता दल युनायटेडमध्ये लोकसभा निवडणुका 2019 च्या जागावाटपासाठी 50-50 चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या दबावाला न जुमानता जदयू अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पक्षासाठी समसमान जागा मिळवण्याच्या यशस्वी वाटाघाटी केल्या.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जनता दल समान जागा लढवतील, तर एनडीएमधील रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक सेवा समता पक्षालाही काही जागा सोडल्या जातील. जागावाटपाची बोलणी यशस्वी झाल्याची माहिती अमित शाह आणि नितीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोणाच्या वाट्याला कोणते मतदारसंघ येतील, याबाबतचा निर्णय येत्या 2-3 दिवसांत जाहीर करणार असल्याचंही अमित शाह यांनी सांगितलं. बिहारमध्ये एनडीएत कोणतेही मतभेद नाहीत. उपेंद्र कुशवाह आणि रामविलास पासवान आमच्यासोबत आहेत. विरोधकांच्या अपप्रचाराला कोणताही आधार नाही, असा टोलाही शाह यांनी लगावला.

जागावाटपानंतर बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाह यांची भेट घेतली. मात्र यादव यांची भेट हा निव्वळ योगायोग असल्याचं कुशवाह यांनी स्पष्ट केलं.