नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यातली कोर्टातली लढाई अखेर सामंजस्याने संपली. गडकरींनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी माफी मागितली आणि दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टातलं हे प्रकरण संपवण्यात आलं.

कोर्टात दिग्विजय सिंह यांची भाषा बदललेली दिसून आली. नितीन गडकरी आणि खासदार अजय संचेती यांच्याबद्दलचं वक्तव्य राजकीय गरमागरमीत केलेलं होतं. त्यात काही तथ्य नाही, असं दिग्विजय सिंह यांच्याकडून कोर्टात सांगण्यात आलं.

काय आहे प्रकरण?

गडकरी यांचे त्यांच्याच पक्षाचे खासदार अजय संचेती यांच्याशी व्यावसायिक संबंध आहेत. त्या माध्यमातूनच कोळसा खाण वाटपात हितसंबंध जपले गेले आणि 490 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा दिग्विजय सिंह यांनी आरोप केला होता.

नितीन गडकरींवर 2012 च्या दरम्यान हे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर नितीन गडकरींनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला.

केस संपवण्यासाठी पटियाला हाऊस कोर्टात याबाबत नंतर दोन्ही पक्षांनी जॉईंट अॅप्लिकेशन केलं होतं. कोर्टाने ही मागणी मान्य केली.