CBSE 10th result 2018 LIVE : नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे 500 पैकी 499 गुण मिळवत एक, दोन नव्हे तर चार विद्यार्थी बोर्डात अव्वल आले आहेत.


या चार विद्यार्थ्यांमध्ये तीन मुलींचा समावेश आहे. प्रखर मित्तल (डीपीएस गुरुग्राम), रिमझिम अग्रवाल (आरपी पब्लिक स्कूल), नंदिनी गर्ग (शामली) आणि श्रीलक्ष्मी (भवानी विद्यालय कोच्ची) यांनी 499 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे.

निकालात मुलींची बाजी
यावर्षी दहावीचा निकाल 86.70 टक्के लागला. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मुलींचा निकाल मुलांपेक्षा 3.35 टक्क्यांनी जास्त आहे.

त्रिवेंद्रम विभाग अव्वल
तर विभागवार निकालात यंदा 99.60 टक्क्यांसह त्रिवेंद्रम विभागाने पहिलं स्थान मिळवलं. तर चेन्नई 97.37 टक्क्यांसह दुसरं आणि अजमेर 91.86 टक्क्यांसह तिसरं स्थान पटकावलं.

दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का प्रथम
दहावी बोर्डात यंदा दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये 489 गुणांसह अनुष्का पांडा आणि सान्या गांधी यांनी पहिला क्रमांक मिळवला. तर सौम्यदीप प्रधानने 484 गुणांसह तिसरं स्थान मिळवलं.

CBSE 10th result 2018 : दहावीचा निकाल जाहीर

16 लाखांहून जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा
5 मार्च ते 12 एप्रिल या काळात देशभरातील 453 केंद्रांवर सीबीएसई दहावीची परीक्षा घेण्यात होती. तर परदेशात दहावी इयत्तेचे एकूण 78 परीक्षा केंद्र होते. यंदा एकूण 16,38, 428 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, ज्यात मुलींची संख्या 6,71, 103 आणि मुलांची संख्या 9,67,325 होती.

निकाल कुठे पाहता येणार?
विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटसह cbseresults.nic.inresults.nic.in आणि results.gov.in वर पाहता येणार आहे.

निकाल कसा पाहावा?

  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.nic.in  वर क्लिक करा

  • इथे तुम्हाला 10 वी आणि 12 वी असे पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला कोणता निकाल पाहायचा आहे तो निवडा.

  • 10 वीचा निकाल पाहण्यासाठी CBSE 10th result 2018 वर क्लिक करा.

  • तुमचं नाव, नंबर वगैरे माहिती भरल्यानंतर दहावीचा निकाल दिसेल.

  • पुढील वापरासाठी तुम्ही निकालाची प्रत डाऊनलोड करु शकता.