मुंबई ते बाली क्रूझ लवकरच : नितीन गडकरी
एबीपी माझा वेब टीम | 13 Jun 2018 12:00 AM (IST)
कोची आणि अंदमान-निकोबार बेटांमार्गे ही क्रूझ बालीपर्यंत प्रवास करणार आहे.
पणजी : मुंबईहून लवकरच तुम्हाला समुद्रमार्गे इंडोनेशियाला जाता येणार आहे. कोची आणि अंदमान-निकोबार बेटांमार्गे ही क्रूझ बालीपर्यंत प्रवास करणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-बाली क्रूझबाबत काम सुरु असल्याची माहिती दिली. तो गोव्यातील पणजीमध्ये एका कार्यक्रमानंतर बोलत होते. 'हजारो भारतीय बालीला प्रवास करतात. आता ते मुंबईहून क्रूझने प्रवास करतील. हा मोठा पर्यटनाचा आकर्षणबिंदू ठरेल. आपल्या देशातून एक लाख नागरिक सिंगापूरला क्रूझने जातात. क्रूझ टुरिझम वाढवणं हा आपला उद्देश आहे' असंही गडकरींनी स्पष्ट केलं. सी प्लेनबाबत हवाई वाहतूक नियंत्रण प्राधिकरणाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. महिन्याअखेरपर्यंत त्याबाबत अंतिम निर्णय होईल, असंही गडकरींनी सांगितलं.