बंगळुरु : कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने एका आरोपीला अटक केली आहे. 26 वर्षीय परशुराम वाघमारेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


कर्नाटकमधील सिद्धगीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. वाघमारेला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्या कटात त्याची भूमिका काय होती, याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. मात्र सीसीटीव्ही फुटेजचा तपास केल्यानंतर परशुराम वाघमारेनेच गौरी लंकेश यांच्यावर गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

पश्चिम बंगळुरुतील राहत्या घराबाहेर 5 सप्टेंबर 2017 रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. कर्नाटक पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच चार जणांना अटक केली होती, त्यामध्ये पुण्याच्या अमोल काळे या तरुणाचा समावेश होता.

गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.