मुंबई: नुकताच सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा असून त्यामुळे आत्मनिर्भर भारताची दिशा मिळाली आहे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते वर्धा येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले की, "आपल्या देशामध्ये कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर या प्राधान्य क्षेत्राला कर्ज देण्यासाठी बॅकांसमोर 16 लाख कोटी रुपयांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. याचा फायदा निश्चितपणे शेतकरी आणि शेती क्षेत्राला होणार आहे.'
नव्या कृषी कायद्यावर बोलताना ते म्हणाले की, "आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं काम करत आहे. नवीन कृषी कायद्यात कोणती बाब शेतकऱ्यांच्या हिताची नाही ते विरोधकांनी सांगावे. शेतकऱ्यांना स्वतःच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही काय? एमएसपीकरीता आमच्या सरकारने 3.50 लाख कोटी दिले आहेत. सध्या कृषी क्षेत्रात अनेक समस्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे. पण नवीन कायद्यांवरुन काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत."
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की," येणाऱ्या काळात रोजगार वाढावे म्हणून एमएसएमई क्षेत्रांना 15 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामध्ये ज्यांचं रेकॉर्ड चांगलं आहे त्यांना भांडवली बाजारात इक्विटीची सुविधा उपलब्ध करुन देणार आहोत. त्यामुळे येत्या काही वर्षात या क्षेत्राचा विकास होऊन रोजगारही वाढतील."
अर्थसंकल्पातील स्क्रॅपेज पॉलिसीबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की, "सरकारी विभागातील आणि सार्वजनिक क्षेत्राकडील 15 वर्षापेक्षा जुन्या वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे आणि अशी वाहने थेट भंगारात काढण्यात येणार आहेत. याबाबतच्या व्हेइकल स्क्रॅपेज पॉलिसीला मंजूरी मिळाली आहे. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राची उलाढाल ही 4.5 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी 1.45 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनाची आपण निर्यात करतो. येत्या काळात प्रदूषण कमी करण्यासाठी 25 हजार इलेक्ट्रीक बस रस्त्यावर धावतील. त्यामुळे टिकीट दरही कमी होतील."
कोरोनाच्या काळात सर्व काही ठप्प असताना आमच्या सरकारने रेकॉर्ड ब्रेक प्रमाणात रस्त्यांची बांधणी केली असं गडकरी म्हणाले. एकंदरीत रोजगार निर्मितीबरोबरच विकास आणि देशातील पायाभूत सुविधांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितंल.
अर्थसंकल्पातील तरतूदींवर नजर टाकल्यास असं लक्षात येतं की देशाच्या इतिहासातील पहिला आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असल्याचंही नितीन गडकरींनी मत व्यक्त केलं.
जुन्या वाहनांवर लवकरच 'ग्रीन टॅक्स' लागणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा निर्णय