मुंबई : डिजिटल पेमेंट सर्व्हिसेस बळकट करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 24 तासांचा हेल्पलाईन नंबर सुरु करणार आहे. आरबीआयने म्हटलं की, सप्टेंबर 2021 पर्यंत देशभरात एक केंद्रीकृत हेल्पलाईन नंबर आणला जाईल. जेणेकरुन ग्राहकांना विविध डिजिटल पेमेंट प्रोडक्टची माहिती मिळू शकेल आणि त्यांच्या तक्रारी नोंदवता येतील. वन नेशन, वन लोकपाल योजनेंतर्गत या हेल्पलाईनवर डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. डिजिटल पेमेंट, बँकिंग आणि फायनान्स कंपन्यांशी संबंधित काही तक्रारी असल्यास, या क्रमांकावर नोंदणी करता येईल. शुक्रवारी आर्थिक धोरण जाहीर करताना आरबीआयने ही माहिती दिली.


'एक राष्ट्र, एक लोकपाल'


आरबीआयच्या म्हणण्यानुसार, तक्रारींचे निवारण करण्यासाठी सध्या बँकिंग, नॉनबँकिंग फायनान्स कंपन्या आणि डिजिटल व्यवहारात तीन वेगवेगळे लोकपाल तयार करण्याची योजना आहे. आता या तिघांसह एक राष्ट्र, एक लोकपाल यंत्रणा कार्यान्वित होईल. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना तक्रारींच्या निराकरणासाठी एकच व्यवस्था देणे. त्याअंतर्गत आरबीआय जून 2021 पर्यंत एकात्मिक योजना आणण्याची शक्यता आहे. याद्वारे, ग्राहकांना तक्रारीसाठी वेगवेगळी नाही तर एकच व्यवस्था प्राप्त होणार आहे.


डिजिटल पेमेंट सेवा मजबूत करण्यासाठी पाऊल


आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ऑथराइज्ड पेमेंट सिस्‍टम्सचे ऑपरेटर आणि पार्टिसिपेंट्स यांच्यावतीने प्रदान केलेली उत्पादने विविध प्रकारच्या अॅक्टिविटी करतात. बर्‍याचदा हे उपक्रम आउटसोर्स केले जातात. कार्यक्षमता वाढवणे आणि खर्च कमी करणे हा यामागील हेतू आहे. तथापि, अशा आऊटसोर्स सेवा प्रदान करणार्‍यांसाठी सिस्टमचा धोका देखील वाढतो. यामुळे सायबर सुरक्षेचा धोका वाढतो. हा धोका लक्षात घेता आरबीआय मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. डिजिटल पेमेंट सेवा बळकट करण्यासाठी आधीच घेतलेल्या उपाययोजनांचा हा एक भाग म्हणून आरबीआयचे हे पाऊल टाकले आहे.