नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्रासाठी वेगळ्या विदर्भाचा नव्हे तर पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात पाच वर्षात 3 लाख कोटींची गुंतवणूक करण्याचं लक्ष्य आहे. आतापर्यंत 6 हजार कोटींचा निधी दिला आहे. मात्र चांगल्या सुविधांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत, त्यामुळे टोलपासून मुक्ती होणं असंभव आहे, असं केंद्रीय परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

 

राजधानी दिल्लीत 'एबीपी माझा'च्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मराठी मंत्र्यांचं महाराष्ट्राबाबतचं व्हिजन 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमातून मांडण्यात येत आहे.

 

गडकरींचं व्हिजन

 

या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच नितीन गडकरींनी आपलं व्हिजन मांडलं. यावेळी गडकरी म्हणाले, महाराष्ट्रासाठी वेगळ्या विदर्भाचा नव्हे, तर पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. काही बुद्धीवादी लोक वेगळ्या विदर्भाबाबत चर्चा करत आहेत, त्यांना चर्चा करु द्या. वाद घालण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्याला प्राधान्य आहे"

 

याशिवाय " निवडणूक काळात टोल हद्दपार करण्याचं विधान मी केलं असलं, तरी चांगले रस्ते आणि सेवा हव्या असतील तर टोलला पर्याय नाही. सरकारकडे पैसे नाहीत, त्यामुळे टोलसारखे स्त्रोत बंद केले तर सुविधा मिळणं कठीण होईल" असंही गडकरींनी नमूद केलं.

 

तसंच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस उत्तम काम करत आहेत. येत्या काळात महाराष्ट्र हे विकासात देशात अव्वलस्थानी असेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.

 

जिथं-जिथं रस्त्यांचं काम सुरु आहे, त्याला लागून असलेल्या शेतांमध्ये शेततळे, नाल्यांचं रुंदीकरण अशी कामं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय स्वतःहून करुन देईल, असंही ते म्हणाले.

 

शेतकऱ्यांना स्वातंत्र्य द्या

 

महाराष्ट्रातील दुष्काळ आणि ऊस पीक याबाबत गडकरींना विचारण्यात आलं. यावर गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांना बाजाराप्रमाणे उत्पादन घेण्याचं स्वातंत्र्य आवश्यक आहे. ज्या पिकाला दर मिळेल, ते पीक त्यांना घेऊ द्यावं. शेतीसाठी सिंचन आवश्यक आहे. पाण्याची बचत गरजेची आहे.

 

गडकरींच्या व्हिजनमधील महत्त्वाचे मुद्दे
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गावांना चांगल्या रस्त्यांनी जोडणार

सरकारी खर्चातून 70 हजार कोटींची विमानं खरेदी करण्याची गरज नव्हती, जनतेला रस्ते, पाणी महत्त्वाचं होतं.

मी महाराष्ट्राला 6 हजार कोटींचा निधी दिला -
देशाच्या वाहतूक यंत्रणेत अमूलाग्र बदल आवश्यक -
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा गरजेची, जलवाहतुकीला आमचं प्राधान्य
उद्योगांचं विकेंद्रीकरण आवश्यक

5 वर्षात महाराष्ट्रात 3 लाख कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्रात सेना-भाजपच्या वादाशी माझा संबंध नाही, माझे सर्व पक्षांशी उत्तम संबंध:
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस उत्तम काम करत आहेत
शेतकऱ्याला पिकाचं स्वातंत्र्य द्या, ज्याला दर असेल, ते पीक शेतकऱ्यांना घ्यावं :
शेतीसाठी सिंचन आवश्यक, पाण्याची बचत गरजेची : गडकरी
यशवंतरावांनी महाराष्ट्राला संस्कारी राजकारण दिलं, ते देशात अन्य राज्यात पाहायला मिळत नाही
विकासकामात राजकारण आणि राजकारणात शत्रूत्व आणू नये, ही यशवंतरावांपासूनची परंपरा
महाराष्ट्राला साहित्य, संस्कार, वैचारिकतेची मोठी परंपरा
मला वन डे खेळायला आवडतं, त्यामुळे जो शब्द दिला, तो शब्द 5 वर्षात झटपट पूर्ण करण्याचा प्रयत्न