नवी दिल्ली :  एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस द्यावेत हे प्रोटोकॉलला धरुन नसून सध्या तरी ते अशक्य आहे असं निती आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतात जे लसीकरण होतंय ते नियमांनुसार आणि दोन डोसचे वेळापत्रक पाळूनच होईल असंही निती आयोगानं सांगितलं आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांनी ही माहिती दिली. लस तुटवडा असताना, अनेक नागरिकांना दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागत असताना अशा प्रकारे दोन वेगवेगळे डोस देण्याची शक्यता पुढे आली होती. पण सध्या तरी हे शक्य नाही असं केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय.


निती आयोगाचे (आरोग्य) सचिव डॉ.व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, भारतात सुरु असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये कोणताही बदल होणार नाही. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे 12 आठवडे तर कोवॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर हे चार ते सहा आठवडेच राहणार आहे. 


 






डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, "एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळे डोस दिल्यास त्यामुळे संबंधित व्यक्तीला रिअॅक्शन येण्याची शक्यता आहे. काही प्रकरणात असं लक्षात आलंय की दोन वेगवेगळे डोस घेतल्यानं संबंधितामध्ये रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मोठी वाढ झालीय. पण सध्यातरी अशा प्रकारे एकाच व्यक्तीला दोन वेगळ्या लसींचे डोस देण्यात येणार नाही."


देशात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाच्या कार्यक्रमात अडचणी येत आहेत. त्यात पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीला त्याच लसीच्या दुसऱ्या डोससाठी ताटकळत रहायला लागत असल्याचं चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून एकाच व्यक्तीला दुसऱ्या डोसच्या रुपात उपलब्ध कोणतीही लस देण्यात यावी अशी मागणी पुढं येत होती. 


महत्वाच्या बातम्या :