ठाणे : रेल्वे डब्यातून विनातिकीट प्रवास केल्याप्रकरणी दंडाची रक्कम भरण्यास सांगितली असता, अरेरावी करुन तिकीट निरीक्षका मारहाण करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. दिवा स्थानकावर मंगळवारी (1 जून) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. कुणाल संजय शिंदे (वय 21 वर्षे) आणि त्याचा साथीदार हर्षल गिरीधर भगत (वय 25 वर्षे) यांच्यावर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपस करत आहेत. धक्कादायक म्हणजे आरपीएफ जवनासमोर ही घटना घडली. 


विकास दत्ताराम पाटील( वय 49 वर्षे) हे रेल्वेचे मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. 1 जून रोजी सकाळी 7 ते 3 या काळात तिकीट तपासणीचे कर्तव्य विकास पाटील बजावत होते. त्यांच्यासोबत टी.टी.आय गणेश जी देवडिगा आणि आरपीएफ जवान रजनीश कुमार होते. त्यांनी दादर रेल्वे स्थानकातून 9.29 च्या टिटवाळा लोकलमध्ये तिकीट तपासणी सुरु केली. अनेक प्रवाशांवर विनातिकीट किंवा विनापरवानगी प्रवास करताना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. शेवटी तिघे कर्मचारी हे ठाणे स्टेशनवर आले. पुढील प्रवासातही तिकीट तपासणीचे काम सुरु होते. कळवा-मुंब्रा दरम्यान कुणाल शिंदे या प्रवाशाचे तिकीट तपासले असता तिकीट चुकीचे आणि ओळखपत्र नसल्याने 765 रुपये दंड भरण्यास त्यांनी सांगितले. मात्र त्याने पैसे नसल्याचे सांगून दिवा स्टेशनजवळ आल्यावर तिकीट तपासनीस पाटील यांच्याशी अरेरावीची भाषा केली. त्यानंतर कुणालने कुणाला तरी फोन करुन,  "मला पकडले आहे, पैसे भरण्यास सांगत आहेत, ये" असे बोलून तिकीट निरीक्षक पाटील यांची कॉलर पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरु असतानाच तिथे हर्षल भगत हा कुणालचा मित्र आला आणि त्याने देखील रेल्वे कर्मचाऱ्यांना मारहाण केली. 


हा सर्व प्रकार पाहून स्टेशनवरील आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी त्यांना सोडवले. विकास पाटील टी.टी.आय गणेश देवडिगा आणि आरपीएफ राजनीश कुमार यांनी कुणाल आणि हर्षल यांना ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या विरोधात मारहाणीचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस अधिक तपस करत आहेत.