मुंबई: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 2023 साली होणाऱ्या 139 व्या बैठकीचं यजमानपद भारताला मिळालं आहे. ऑलिम्पिक समितीची ही बैठक मुंबईत होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या निता अंबानी यांनी ही बैठक भारतात व्हावी यासाठी मोठे प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.


भारतासाठी ही घटना महत्त्वाची असून 1983 नंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक होत आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्याच्या दृष्टीने निता अंबानी आणि भारतीय ऑलिम्पिक समिती प्रयत्नशील आहे. 


 






भारताला 2023 साली होणाऱ्या बैठकीचं यजमानपद मिळाल्यानंतर निता अंबानींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, "तब्बल 40 वर्षांनंतर ऑलिम्पिक चळवळ भारतात होणार आहे आणि ही भारतासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. याबद्दल मी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे आभार मानते. त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दलही त्यांचे आभार मानते."




निता अंबानी या 2016 पासून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये भारताच्या प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. या काळात त्यांनी भारतात ऑलिम्पिक खेळांचा विकास व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केला. निता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन असून या माध्यमातून त्यांनी खेळाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. आतापर्यत रिलायन्स फाऊंडेशन 2.15 कोटी युवा खेळाडूंपर्यंत पोहोचलं आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha