Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतात घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दाऊद इब्राहिम विरोधात एक एफआयआर दाखल केली आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. इंडिया टूडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, दाऊद इब्राहिम हा भारतात पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतात घातपात करण्यासाठी त्याने एक विशेष टीम तयार केली असल्याची माहितीही समोर आली आहे. भारतातील महत्त्वाचे राजकीय नेते आणि प्रमुख व्यावसायिक दाऊदने तयार केलेल्या टीमच्या हिट लिस्टवर असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या एफआयआरमधून समोर आली आहे.
दाऊद भारतात घातपात करण्याच्या तयारीत असून तो दिल्ली आणि मुंबई या शहरांना टार्गेट करणार आहे. त्यासाठी तो स्फोटकं आणि घातक शस्त्रास्त्रांचा वापर करणार आहे. यासाठी त्याने योजना आखली असल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात एनआयएने दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह डी-कंपनीच्या सात जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. हे लोक भारतात होत असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि अल कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध आहेत.
याबाबत ईडी इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर, त्याचे साथीदार आणि टोळीतील सदस्यांची चौकशी करणार आहे. त्यासाठीच ईडीने शुक्रवारी इक्बाल कासकर याला अटक केली होती. अटकेनंतर इक्बाल कासकर याला मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला सात दिवसांची ED कोठडी
- ED Raid in Mumbai : मुंबईत ईडीचं धाडसत्र; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि नेत्यांमधील कराराबाबत कारवाई
- ED raids in Mumbai : मुंबईत ईडीचे छापासत्र, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले...