मुंबई : सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन हटवल्यानंतर आता तीन अधिकाऱ्यांनी कंपनीला 'टाटा' केला आहे. एचआर विभागाचे प्रमुख एनएस राजन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शनिवारी मधू कन्नन आणि निर्मल्या कुमार यांनीही टाटा सन्सला सोडचिठ्ठी दिली. या दोघांची टाटा सन्समध्ये भरती सायरस मिस्त्री यांच्या कार्यकाळातच झाली होती.
सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवल्यानंतर कंपनीचं संचालक मंडळही बरखास्त करण्यात आले होते. 2013 साली मिस्त्री यांनी पाच सदस्यीय समूह कार्यकारी परिषद नेमली होती. राजन, कन्नन आणि निर्मल्या कुमार हे या परिषदेचे सदस्य होते. कन्नन टाटा सन्समध्ये बिझनेस डेव्हलपमेंट आणि कॉर्पोरेट गोष्टी पाहत होते, तर निर्मल्या कुमार स्ट्रॅटेजिक अॅडव्हाईसर होते. या दोघांनी टाटा सन्समधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
टाटा ग्रुपच्या वेबसाईटवरुनही राजीनामा दिलेल्या सर्वांची माहिती हटवण्यात आली आहे. मुकुंद राजन आणि हरीश भट्ट यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन हटवल्यानंतर रतन टाटा यांच्याकडे चार महिन्यांसाठी चेअरमनपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील चेअरमन निवडीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. टाटा सन्सच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ टाटा सन्सच्या माहितीनुसार, रतन एन. टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन, कुमार भट्टाचार्य यांचा समावेश चेअरमन निवडीच्या समितीत आहे.