मुंबई : मुंबईतील मरीन ड्राईव्हपासून कांदिवलीपर्यंत होऊ घातलेल्या कोस्टल रोडला हेरिटेज समितीने परवानगी दिली आहे. दक्षिण मुंबईपासून कांदिवलीपर्यंतच्या या मार्गात मरीन ड्राईव्ह आणि वांद्रे याठिकाणी काही बदलही सुचवण्यात आले आहेत.


प्रस्तावित कोस्टल रोडला आता हेरिटेज समितीनेही हिरवा कंदील दिल्यामुळे आता या प्रकल्पाच्या भूतांत्रिक सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सुमारे ३५ किलोमीटरचा सागरी किनारा रस्ता तयार करण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही संकल्पना मांडली होती.

दरम्यान, मरीन ड्राइव्ह आणि वांद्रे फोर्ट येथे काही बदलही या मार्गात करण्यात आलेत. त्याचबरोबर या कोस्टल रोडचा स्टार्टिंग पॉइंट एनसीपीऐवजी प्रिन्सेस स्ट्रीट येथून करण्याचा महत्त्वपूर्ण बदल यात करण्यात आलाय.

कोस्टल रोडसाठी आवश्यक असणार्‍या विविध परवानग्या यापूर्वीच मिळाल्या आहेत. यात सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, उच्चस्तरीय समिती, महाराष्ट्र महाराष्ट्र सागरी मंडळाच्या परवानग्यांचा समावेश आहे.