नवी दिल्ली : देशाला हादरवणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आणखी एका दोषीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विनय शर्माच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे तिहार जेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


 
औषधं घेऊन आणि गळफास लावून विनय शर्माने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला दीनदयाळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

 
निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषी रामसिंगनेही कारागृहातच आत्महत्या केली होती. 11 मार्च 2013 त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यामुळे कारागृहातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

 
16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीतील 23 वर्षीय तरुणीवर धावत्या बसमध्ये गँगरेप झाला होता. त्यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली. अंतर्गत रक्तस्रावामुळे आठवड्याभराने तिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 
गँगरेप प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला तीन वर्षांच्या कारावासानंतर सोडण्यात आलं. तर चौघा दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र त्यापैकी एकाने आत्महत्या केली.