नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. तीन आरोपींनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. या प्रकरणातील चौथ्या आरोपीने पुनर्विचार याचिका दाखल केली नव्हती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता तिन्ही आरोपींना फाशी होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. आरोपींना आता राष्ट्रपतींकडून माफी मिळवण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उरला नाही. आजच्या सुनावणीला निर्भयाचे आई-वडील आणि वकील न्यायालयात उपस्थित होते.
या प्रकरणी पवन, मुकेश, विनय आणि अक्षय या चार दोषींना दिल्ली सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळत सर्व दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, 'निर्भया प्रकरणातील आरोपी दयेस पात्र नाहीत.'
निर्भया प्रकरणात आतापर्यंत काय झालं?
16 डिसेंबर, 2012 : दिल्लीच्या मुनिरकामद्ये सहा जणांनी एका बसमध्ये पॅरामेडिक विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर तरुणीला आणि तिच्या मित्राला चालत्या बसमधून फेकून दिलं.
18 डिसेंबर, 2012 : राम सिंह, मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ता यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. 21 डिसेंबरला या प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीला दिल्लीमधून आणि सहावा आरोपी अक्षय ठाकूरला बिहारमधून अटक केली होती.
29 डिसेंबर, 2012 : निर्भयाने सिंगापूरच्या एका रुग्णालयात प्राण सोडले.
3 जानेवारी, 2013 : पोलिसांनी पाच आरोपींविरोधात हत्या, गँगरेप, हत्येचा प्रयत्न, अपहरण, चोरी इत्यादी आरोपांतर्गत चार्जशीट दाखल केली.
17 जानेवारी, 2013 : फास्ट ट्रॅक कोर्टाने पाच आरोपींवर आरोप निश्चित केले.
11 मार्च 2013 : आरोपी राम सिंहने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली.
31 ऑक्टोबर, 2013 : बालगुन्हेगारी न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला गँगरेप आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवत तीन वर्षांसाठी त्याची रवानगी बालसुधारगृहात केली.
10 सप्टेंबर, 2013 : फस्ट ट्रॅक कोर्टाने इतर चार आरोपींनी 13 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं.
13 सप्टेंबर, 2013 : दोषी मुकेश, विनय, पवन आणि अक्षयला फाशीची शिक्षा ठोठावली.
13 मार्च, 2014 : दिल्ली हायकोर्टने चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
2014-2016 : दोषींनी फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं.
5 मे, 2017 : सर्वोच्च न्यायालयाकडून चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम
9 जुलै 2018 : सर्वोच्च न्यायालआकडून पुर्नविचार याचिका फेटाळत दोषींची फाशी कायम