श्रीनगर : जम्मू कश्मीरमध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या भाऊ दहशवादी बनला आहे. शमसुल हक मेंगनू असं या आयपीएस अधिकाऱ्याच्या भावाचं नाव आहे. शमसुल दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये गेल्याचा दावा केला जात आहे.


हिजबुल मुजाहिद्दीनने शमसुलचा एक फोटो रविवारी जारी केला. या फोटोमध्ये शमसुल एक-47 रायफल दाखवताना दिसत आहे. शमसुल 22 मेपासून श्रीनगर विद्यापीठातून गायब झाला होता. कुटुंबाने त्याचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला.


रविवारी बुऱ्हाण वाणीच्या मृत्यू दिवसानिमित्त हिजबुलनं आपल्या नव्या साथीदारांची यादी आणि फोटो जारी केले. त्या यादीत शमसुलचा समावेश आहे. शमसुल मूळचा शोपियन भागातील द्रगुड गावचा रहिवाशी आहे. तो काश्मीर विद्यापीठात उनानी मेडिसिनचा अभ्यासक्रम शिकत होता.


पोलिसांकडून याबाबत शोध घेतला जात आहे. मात्र एक भाऊ देशसेवा करत असताना दुसरा भाऊ देशद्रोही बनल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. शमसुल 2012चे आयपीएस अधिकारी इनामुल हक यांचा भाऊ आहे.


काश्मीर खोऱ्यातील अनेक तरुण दहशतवादाकडे
काश्मीर खोऱ्यातील तरुणांचं दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलं आहे. डोडा जिल्ह्यातील आबिद भट नावाचा तरुणही दहशतवाद्यांना मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आबिद गेल्या काही दिवसांपासून गायब आहे आणि तो दहशवादी संघटनेत गेला असल्याची माहिती पोलिसांना सोशल मीडियावरुन मिळाली आहे. पोलिस याबाबत सखोल तपास करत आहेत.


आबिदच्या कुटुंबीयांनीही तो दहशतवादी संघटनेत सामील झाल्याच संशय व्यक्त केल आहे. तसेच त्याला सुरक्षित घरी आणण्याची विनंती त्यांनी पोलिसांना केली आहे. याशिवाय गेल्या महिन्यात पुलवामामधील एक पोलिस अधिकारी गायब झाल्याची माहिती समोर आली होती.


एप्रिल महिन्यात शोपियानमधील मीर इदरीश सुल्तान नावाचा पोलीस शिपाई गायब झाला होता. काही दिवसांनी तो दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामिल झाल्याचं समोर आलं होतं. गेल्या वर्षभरात जवळपास 50 युवक अतिरेकी संघटनेत सामील झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे काश्मीरमधील तरुणांचं दहशतवादाकडे वळणे हा चिंतेचा विषय बनला आहे.