China Funding Row : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी 'न्यूजक्लिक' या न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ (Prabir Purkayastha) तसेच फर्मचे शेअरहोल्डर अमित चक्रवर्ती यांना दहशतवादविरोधी कायद्यानुसार बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक केली. न्यूजक्लिक आणि त्याच्या पत्रकारांशी संबंधित 30 परिसरांवर दिवसभर छापे टाकून चौकशी केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येणार आहे. याच प्रकरणात स्पेशल सेलच्या कार्यालयात अनेक आरोपींची चौकशी सुरू राहणार आहे.


दक्षिण दिल्लीतील साकेत येथील न्यूजक्लिकचे कार्यालयही सील करण्यात आलं आहे. चीनच्या समर्थनार्थ प्रचारासाठी पैसे मिळाल्याच्या आरोपानंतर 'न्यूजक्लिक'वर ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआर भागात विशेष सेलचे छापे सकाळपासून सुरू झाले. नंतर प्रबीर पुरकायस्थ यांना 'न्यूजक्लिक'च्या दक्षिण दिल्लीतील कार्यालयात नेण्यात आलं, जिथे फॉरेन्सिक टीम आधीच उपस्थित होती. 


सर्व पत्रकारांना विचारण्यात आले 25 प्रश्न 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली, त्यात पत्रकार उर्मिलेश, अनिंद्यो चक्रवर्ती, अभिसार शर्मा आणि परंजय गुहा ठाकुरता तसेच इतिहासकार सोहेल हाश्मी आणि सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंटचे डी. रघुनंदन यांचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितलं की, पोलिसांनी विविध मुद्द्यांशी संबंधित 25 प्रश्न विचारले, ज्यात त्यांचे परदेश दौरे, शाहीन बागेतील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध, शेतकऱ्यांचं आंदोलन इत्यादी प्रश्नांचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितलं की, ज्या लोकांची चौकशी करण्यात आली आहे त्यांची ए, बी आणि सी अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे.


देशाची तपास यंत्रणा स्वतंत्र : अनुराग ठाकूर 


केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, देशातील तपास यंत्रणा स्वतंत्र आहेत आणि त्या कायद्यानुसार काम करतात. ते म्हणाले, '...कोणी काही चुकीचं केलं असेल तर तपास यंत्रणा त्या संदर्भात काम करते. तुम्ही बेकायदेशीरपणे पैसे घेतले असतील किंवा काही आक्षेपार्ह केलं असेल, तर तपास यंत्रणा त्याची चौकशी करू शकत नाही, असं कुठेही लिहिलेलं नाही." 


लोधी रोड स्पेशल सेल कार्यालयात चौकशी 


सुमारे सहा तासांच्या चौकशीनंतर उर्मिलेश आणि चक्रवर्ती दुपारी 4.15 वाजता लोधी रोडवरील स्पेशल सेलच्या कार्यालयातून बाहेर आले. यावेळी त्यांनी तिथे जमलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत. यादरम्यान उर्मिलेश म्हणाले की, मी काहीही बोलणार नाही. सुमारे तासाभरानंतर शर्मा तपास यंत्रणेच्या कार्यालयातून बाहेर आले. त्यांच्यानंतर रघुनंदन बाहेर आले, त्यांनी पत्रकारांना सांगितलं की, त्यांना 'न्यूजक्लिक' बद्दल अतिशय सामान्य प्रश्न विचारण्यात आल्याचं म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


चिनी फंडींग प्रकरणी दिल्लीत NewsClick च्या पत्रकारांच्या घरांवर पोलिसांच्या धाडी; अनेकांचे मोबाईल, लॅपटॉपही जप्त