चेन्नई : रंग, रुप, सौंदर्य यांच्या तथाकथित संकल्पनांचा पगडा सर्वसामान्यांच्या मनात किती खोलवर रुजला आहे, याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. नवरा हँडसम नसल्याच्या धारणेतून तामिळनाडूत नववधूने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वरवंट्याने डोकं फोडून 22 वर्षीय तरुणीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. मंगळवारी दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. त्यानंतर तिने पतीवर वरंवट्याने हल्ला केला. त्यातच तरुणाचा मृत्यू झाला.
सुतारकाम करणारा मयत तरुण हा दिसायला रुबाबदार नसल्याचं आणि तिच्यासाठी अनुरुप नसल्याचं नातेवाईक आणि मित्रांनी तिला सांगितलं होतं. याच समजुतीतून ती काही दिवस नाराज होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पतीच्या हत्येनंतर तरुणी रडत घराबाहेर आली आणि कोणीतरी आपल्या पतीचा जीव घेतल्याचा बनाव तिने रचला. मात्र तपासात पोलिसांनी सत्य शोधून काढलं आणि तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. तिची रवानगी सध्या पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.