New Year Celebration at LOC :  नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला लोक जल्लोषात (New Year Celebration 2024) असल्याचे दिसून आले. रविवारच्या मध्यरात्रीनंतर नवा दिवस, नवं वर्ष सुरू झाले. देशभरात नव्या वर्षानिमित्ताने स्वागत दिसून आले. देशभरात उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे भारत पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गावातही उत्साह दिसून आला. एलओसीला लागून असलेल्या गावांमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी स्थानिक लोकांसह न्यू ईयर सेलिब्रेशन केले. रात्री उशिरा एलओसी चौकीवर गस्त आणि पहारा देण्यापूर्वी सैनिकांनी स्थानिकांसोबत गरम चहा घेतला. त्याशिवाय, जेवण आणि नृत्य केले. जवानांनी ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. 


जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमधील एलओसीजवळील चुरुंडा गावात रविवारी सायंकाळी 4  वाजण्याच्या सुमारास नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू झाले. या दरम्यान, सैन्य आणि ग्रामस्थांनी एकमेकांना आनंदाच्या आणि आव्हानात्मक काळात साथ देण्याचा शब्द दिला. 


'अडचणीच्या वेळी मदतीला सर्वप्रथम सैन्य येते'


स्थानिक सामाजिक कार्यकर्ते लाल हसन कोहली म्हणाले की, गरजेच्या काळात नागरिक सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले आहेत. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा कार्यक्रम लष्करानेच आयोजित केला होता. याबद्दल मी लष्कराचे अभिनंदन आणि आभार मानतो. ते म्हणाले, "जेव्हा आम्हाला कोणतीही अडचण येते, तेव्हा सर्वात कठीण प्रसंगी लष्कर आमच्या मदतीला धावून येते."


'लष्करामुळे शत्रू प्रवेश करू शकत नाही'


कोहली म्हणाले की, आमच्या भागात शत्रूला प्रवेश न दिल्याबद्दल स्थानिक लोक लष्कराचे आभारी आहेत. आम्ही सर्व महत्त्वाचे दिवस लष्करासोबत साजरे करतो. प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिन आहे. गावात होणाऱ्या लग्न समारंभातही सैनिक सहभागी होतात. आम्ही भावासारखे राहतो. ते म्हणाले की, आमचे लष्कराशी घट्ट नाते आहे आणि ते मजबूत राहो ही प्रार्थना. ,


'घरापासून दूर राहणाऱ्या सैनिकांना आनंद साजरा करण्याची संधी'


गावचे सरपंच लाल दीन खटाणा म्हणाले की, अशा कार्यक्रमांमुळे आनंद साजरा करता येतो. नियंत्रण रेषेवरील झिरो पॉइंटवर आम्ही लष्करासोबत नवीन वर्ष साजरे करतो. हा खूप चांगला कार्यक्रम आहे आणि ही परंपरा भविष्यातही अशीच चालू राहावी अशी आमची इच्छा आहे. घरापासून दूर राहणाऱ्या सैनिकांना आनंद साजरा करण्याची संधी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्थानिक शाळेतील शिक्षक जहांगीर लतीफ यांनी नियंत्रण रेषेजवळ 2023 शांततापूर्ण क्षेत्र केल्याबद्दल लष्कराचे आभार व्यक्त केले. 2024 हे वर्ष शांततेचे असेल आणि आपण सर्व एकोप्याने जगू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.